समता पक्षाचा ‘मशाल’वर दावा, ठाकरे गटाची चिन्हावरून कोंडी?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) या गटाला मिळालेल्या धगधगत्या मशाल या चिन्हावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दिवगंत नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पार्टीने मशाल चिन्हावर दावा केला असून अंधेरीतील पोटनिवडणुकीत उमेदवार उभा करणार असल्याची घोषणा केली आहे. समता पार्टीने निवडणूक आयोगाला ई-मेल पाठवून चिन्हावर दावा केला आहे.
शिवसेनेत फूट पडल्यावर शिंदे गटाने शिवसेना पक्षावर दावा केला होता. निवडणूक आयोगाने शिवसेना हे मूळ वापरण्यास मनाई करताना दुसरीकडे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हही गोठवले. त्यानंतर दोन्ही गटांना निवडणूक चिन्ह आणि नाव देण्यात आले.
शिवसेना ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने मशाल हे चिन्ह दिले. मशाल हे चिन्ह समता पार्टीसाठी देण्यात आले होते. मात्र, २००४ मध्ये निवडणूक आयोगाने या पक्षाची प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता रद्द करताना चिन्ह खुले केले होते. त्यामुळे ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने मशाल हे चिन्ह दिले.

समता पार्टीचा दावा
समता पार्टीने पुन्हा एकदा ‘मशाल’ या निवडणूक चिन्हावर दावा केला आहे. समता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तृणेश देवळेकर यांनी एका माध्यमांशी बोलताना सांगितले की, जॉर्ज फर्नांडिस १९९४ मध्ये समता पार्टीची स्थापना केली होती. त्यानंतर १९९६ मध्ये मशाल हे चिन्ह दिले होते. त्यानंतर पुढे समता पार्टीचे निवडणूक चिन्ह काढून घेतले असल्याचे सांगत ठाकरे गटाला हे चिन्ह दिले. आता, निवडणूक आयोगाकडे मशाल चिन्ह मिळावे यासाठी ई-मेल केला असल्याचे त्यांनी सांगितले. मशाल चिन्हात साम्य असल्याने मतविभागणीची शक्यता आहे. त्यामुळेच मशाल चिन्ह इतरांना न देण्याची विनंती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

उमेदवार देणार
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत समता पार्टी उमेदवार देणार असल्याचे देवळेकर यांनी सांगितले. आमच्याकडे तगडा उमेदवार असून ही निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, हा उमेदवार कोण असणार, याबाबत त्यांनी भाष्य केले नाही.

समता पार्टीचे चिन्ह कसे आहे?
समता पार्टीच्या झेंड्यात मशाल आहे. मधल्या पट्ट्यात पांढरा रंग तर वर आणि खालील बाजूस हिरवा रंग आहे. मात्र, निवडणूक मतदान यंत्रावर ब्लॅक अँड व्हाइटमध्ये चिन्ह असते. एकाच वेळी दोन उमेदवार मशाल चिन्हासह उभे राहिल्यास मतदारांमध्ये संभ्रम होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!