काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी विखे पाटलांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेसवर नाराजी व्यक्त केल्यानंतर सत्यजित तांबे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे यांची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
एकीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत तर, दुसरीकडे थोरातांचे भाचे आमदार सत्यजित तांबे यांनी राधाकृष्ण विखे पाटीलांचे बंधू राजेंद्र विखे यांची भेट घेतली आहे.


विखे आणि थोरात यांचा राजकीय संघर्ष अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र नाशिक पदवीधर निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी उघडपणे सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिला होता. राजेंद्र विखे यांनी देखील तांबे यांच्या समर्थनार्थ फेसबूक पोस्ट केली होती.
दरम्यान सत्यजित तांबे यांनी भाजपमध्ये यावे अशी थेट ऑफर देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली होती. तांबे यांनी निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आपल्या राजकीय भूमिकेबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे.
या दरम्यान त्यांनी राजेंद्र विखे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढवले जात आहे. परंतु सत्यजित तांबे सध्या त्यांच्या मतदारसंघातील विविध तालुक्यांमध्ये आभार दौरा करत असून त्या अनुषंगानेच त्यांनी विखे यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे.