Updated on: Feb 01, 2023 | 10:58 PM
पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे केंद्र सरकार अर्थसंकल्पातून बड्या घोषणा करण्याची शक्यता आहे. पीएम किसान सन्मान निधीत वाढ करणे, मध्यम वर्गाला आयकरातून सूट देणे आदी निर्णय आज होऊ शकतात.
आर्थिक वर्ष 2023-24 साठीचा आज अर्थसंकल्प आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा बजेट आहे. गेल्या दोन वर्षापासून पेपरलेस बजेट सादर केला जात आहे. यावेळीही पेपरलेस बजेट सादर केला जाईल. आजच्या अर्थसंकल्पातून देशाचा आर्थिक विकास आणि अर्थव्यवस्थेशी निगडीत मोठे निर्णय होतील.
या अर्थसंकल्पातून शेती, शिक्षण, आयकर रचना, आरोग्य आणि सरकारी योजना आदींवर अधिक भर दिला जाण्याची शक्यता आहे. मुलांच्या शिक्षणापासून ते आरोग्य सेवेपर्यंतच्या नियमातही बदल होण्याची शक्यता आहे.


आज कोणती परंपरा तुटणार?
निर्मला सीतारामण या आज सकाळी 11 वाजता आपलं बजेट भाषण सुरू करतील. प्रत्येक बजेट भाषणावेळी निर्मला सीतारामण यांनी कोणती ना कोणती परंपरा बदलण्याचा रेकॉर्ड केला आहे. त्यामुळे आजही भाषण करताना त्या कोणती परंपरा मोडतात याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. तसेच शेतकरी, मध्यमवर्ग आणि उद्योग जगताला त्या काय देतात याचीही सर्वांना उत्सुकता लागली आहे.
आव्हानांचा सामना
पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे केंद्र सरकार अर्थसंकल्पातून बड्या घोषणा करण्याची शक्यता आहे. पीएम किसान सन्मान निधीत वाढ करणे, मध्यम वर्गाला आयकरातून सूट देणे आदी निर्णय आज होऊ शकतात. राजकोषिय घाटा मर्यादित ठेवणं आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला पुढे नेणे तसेच कर्जाचा बोझा कमी करणे आदी आव्हानेही सरकारसमोर आहेत.
आयकरात सूट मिळणार?
आयकरातील सवलतीच्या मर्यादेत कोणताही बदल झाला नाही. गेल्या 9 वर्षापासून हा बदल झाला नाही. अजूनही 2.5 लाख रुपयेच आयकर मर्यादा आहे. केंद्र सरकार 5 लाखाच्या आयकरावर टॅक्स रिबीट देऊ शकते.
यावेळी आयकर सवलत ही 5 लाखाच्या वर जाऊ शकते. तसेच न्यू टॅक्स सिस्टिमला आकर्षक बनवण्याचा प्रयत्नही होऊ शकतो. म्हणजे न्यू टॅक्स सिस्टिममध्ये गृहकर्ज आणि मेडिकल इन्श्यूरन्सशी संबंधित सवलत सामील केली जाऊ शकते.