गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे ईडी कारवाईचा ससेमिरा लागला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते हसन मुश्रीफ, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यासह अनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत. या कारवायांमुळे महाविकास आघाडीचे नेते आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यावर महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली असून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना पत्र लिहले आहे. या पत्रामध्ये संजय राऊत यांनी दौंडमधील भीमा साखर कारखान्यामध्ये ५०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. भाजपा आमदार राहुल कूल यांच्या मालकीचा हा साखर कारखाना आहे.
विशेष म्हणजे विधिमंडळाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर संजय राऊत यांच्यावर हक्कभंगाच्या कारवाईची मागणी केली गेली होती. यासाठी नेमल्या गेलेल्या राऊत हक्कभंग चौकशी समितीचे आमदार राहुल कुल हे प्रमुख आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या आरोपांवर काय प्रतिक्रिया देतात कसे , याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काय आहे संजय राऊत यांचे ट्विट…
“मा. देवेंद्र जी भीमा सहकारी साखर कारखान्याचे प्रकरण आपल्याकडे पाठवीत आहे. शेतकरी लुटला गेलाय हे स्पष्ट दिसत आहे. 500 कोटीचा mony laundring व्यवहार आहे. निःपक्ष चौकशीची आपल्या कडून अपेक्षा आहे” असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. तसेच या ट्विटसोबत त्यांनी या गैरव्यवहाराबद्दलची माहितीही जोडली आहे.