Published at : 31 Jan 2023 01:18PM (IST) BY Gaurav Rane
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प (Budget 2023) सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडून सर्वांनाच फार अपेक्षा आहेत. या अर्थसंकल्पात रेल्वेलाही मोठ्या आशा आहेत. वंदे भारत 2.0, 35 हायड्रोजन ट्रेनची (Hydrogen Train) भेट मिळू शकते. या अर्थसंकल्पात 400 ते 500 वंदे भारत (Vande Bharat) गाड्या, 4000 नवीन ऑटो मोबाईल वाहक डबे, 58000 वॅगन गाड्यांची भेट मिळू शकते. अर्थमंत्री यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1.9 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अर्थमंत्री तिकीट दरात सवलत देतील, अशी ज्येष्ठ नागरिकांची अपेक्षा आहे.


अर्थसंकल्पात रेल्वेसाठी विशेष काय?
अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारीला बजेट सादर करतील तेव्हा काहींच्या चेहऱ्यावरचे हास्य तर काहीच्या निराशा असेल. 2017 पूर्वी रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर केला जात होता, परंतु नंतर तो सर्वसाधारण अर्थसंकल्पासोबतच मांडण्यात येऊन लागला. या अर्थसंकल्पातून दिलासा मिळावा अशी अपेक्षा रेल्वे आणि रेल्वे प्रवासी करत आहेत. त्यामुळे अर्थमंत्री रेल्वेसाठी मोठ्या घोषणा करु शकतात, असं म्हटलं जात आहे. रेल्वे अर्थसंकल्पातील निधी वाढवला जाऊ शकतो. हा निधीचा वापर नवीन लाईन बांधणे, गेज बदल, विद्युतीकरण, सर्वोत्तम सिग्नलिंगसाठी केला जाणार आहे. रेल्वे बजेटमध्ये पायाभूत सुविधांवर भर दिला जाऊ शकतो. गाड्यांचा वेग वाढवण्यावर भर देण्याचं लक्ष्य असेल.
वंदे भारत ते बुलेट ट्रेन, रेल्वेसाठी कोणत्या घोषणा होणार?
या अर्थसंकल्पात 400 ते 500 नवीन वंदे भारत गाड्यांची भेट मिळू शकते. याद्वारे भारतात हायस्पीड गाड्यांचा वेग वाढवायचा आहे. या गाड्यांचा वेग ताशी 180 किमीपर्यंत वाढवायचा आहे. त्याचबरोबर भारताचं उद्देश आहे की, या गाड्या बनवण्यासाठी आपण इतके सक्षम असायला हवं की, येत्या काही वर्षांत त्या गाड्या युरोप, दक्षिण अमेरिका, पूर्व आशियासारख्या देशांमध्ये निर्यात करु शकेल. त्याचबरोबर अर्थमंत्री या बजेटमध्ये स्लीपर कोचसह वंदे भारत ट्रेनची घोषणा करु शकतात. 2025 पर्यंत या गाड्या बनवण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. या अर्थसंकल्पात नवीन रेल्वे रुळ टाकण्यावरही भर दिला जाणार आहे. त्याचबरोबर आगामी अर्थसंकल्पात अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी बजेट वाढवण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. रेल्वेच्या पायाभूत सुविधांवर भर दिला जाऊ शकतो. या अर्थसंकल्पात आधुनिकीकरण, विद्युतीकरण, नवीन रेल्वे लाईन, छोट्या लाईनला मोठ्या लाईन्समध्ये अपग्रेड करणे, सिग्नलिंग सिस्टीम सुधारणे यावर भर दिला जाणार असल्याचं समजतं.


यंदा 2,35,000 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा
भारत इतर ग्रीन फ्यूएलमध्ये मोठ्या गुंतवणुकीची घोषणा करु शकतो. 2022-23 मध्ये, वृद्धांना भरघोस अनुदानासह प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या बहुतांश सवलती बंद केल्यानंतर रेल्वेने मोठ्या प्रमाणात बचत केली होती. तसंच मार्गांच्या विद्युतीकरणामुळेही बचत झाली होती. मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत 2022-23 मध्ये आतापर्यंत 41,000 कोटी रुपयांचा अधिक महसूल कमावल्याचं रेल्वेने म्हटलं आहे. भारतीय रेल्वेला या आर्थिक वर्षात एकूण रु. 2,35,000 कोटी महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.