तर भाजपच्या पराभवाची पाच कारणे
पुण्याचा कसबा मतदारसंघ कॉंग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी जिंकला. लढत चुरशीची होतीच, पण दहा हजारांहून अधिक मताधिक्यासह धंगेकर निवडून आल्याने भाजपला जोरदार धक्का बसला आहे. पुण्याचा कसबा मतदारसंघ भाजपने ताब्यात घेतला तो १९७८ मध्ये. त्यानंतर अरविंद लेले, गिरीश बापट, मुक्ता टिळक हे भाजपचे आमदार होते. १९८५ ची निवडणूक आणि १९९१ ची पोटनिवडणूक वगळता भाजपचेच या मतदारसंघावर प्राबल्य राहिले. गिरीश बापट पाचवेळा इथे आमदार होते.
यावेळी भाजपने प्रथमच ब्राह्मणेतर उमेदवार दिला. या पोटनिवडणुकीत ‘सहानुभूती’ हा मुद्दा नव्हता. ब्राह्मण उमेद्वार असता, तर धंगेकरांचे मताधिक्य वाढले असते. कारण, थेट ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर अशी लढत झाली असती. कसब्याचा चेहरा खास पुणेरी असला तरी इथे ब्राह्मण मतरादारांचे प्रमाण चौदा टक्क्यांहून अधिक नाही. गिरीश बापट सर्व स्तरांमध्ये लोकप्रिय होते. तसा उमेद्वार आता भाजपकडे नव्हता. याउलट कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर हे अत्यंत लोकप्रिय आहेत. ते मूळचे शिवसेनेचे. मग मनसेत गेले. यापूर्वी तीन निवडणुका त्यांनी लढवल्या आहेत. त्यांचा सर्वपक्षीय संपर्क आहे. आजवर भाजप निवडून आले, त्यामध्ये तिरंगी वा चौरंगी लढतींचा वाटाही मोठा होता.
यावेळी विरोधकांनी एकच उमेद्वार दिला. महाविकास आघाडीने ही निवडणूक ‘आघाडी’ म्हणून लढवली. सर्व विरोधक एकवटले होते. मुख्य म्हणजे, प्रचाराची व्यूहरचना प्रभावी होती. त्याचप्रमाणे सोशल मीडिया आणि अन्य माध्यमांचा खुबीने वापर झाला. गणेशोत्सव मंडळे आणि स्थानिक संस्था-संघटनांशी धंगेकरांचा उत्तम संपर्क असल्याचा फायदा झाला.
महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतरची ही पहिली विधानसभा निवडणूक. ठाकरे गटाविषयी असणा-या सहानुभूतीचे दर्शन आदित्य यांच्या ‘रोड शो’मध्ये झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तळ ठोकल्याचा फायदा कमी आणि तोटा जास्त झाला. औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर मतदानापूर्वी झाले. धार्मिक मुद्दे आले. मात्र, ते चालले नाहीत.


धंगेकरांची लोकप्रियता, भाजपकडे चेहरा नसणे, विरोधक एकवटणे, लढत दुरंगी होणे आणि महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतरची सहानुभूती हे मुद्दे महत्त्वाचे ठरले. आणि, तेच झाले, जे अपेक्षित होते. निकाल कसब्याचा असला तरी त्यामुळे राज्याच्या राजकारणाला नवे संकेत मिळाले आहेत. त्यातून विरोधकांचे मनोधैर्य वाढणार आहे आणि भाजपला ‘चिंतन’ करावे लागणार आहे.
भाजपच्या पराभवाची पाच कारणे
१. रविंद्र धंगेकर हे स्वत: पहिल्यापासूनच एक अतिशय सामर्थ्यवान आणि लोकप्रिय असे उमेदवार मानले जात होते. रविंद्र धंगेकर यांचा शिवसेना, मनसे आणि काँग्रेस असा त्रिकोणी राजकीय प्रवास आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू अशी त्यांची ओळख होती. मनसेमध्ये अनेक महत्वाची पदे भूषवलेले रविंद्र धंगेकर कसब्यात मागील २५ वर्षांपासून नगरसेवक होते. ‘जनतेतला माणूस’ या ओळखीचा त्यांना फायदा झाला आणि त्यामुळेच त्यांना आताही पाठिंबा मिळाला. नगरसेवक असताना कधीही मदतीला धावून जाणारे अशी त्यांची ओळख असल्याने ते या निवडणुकीत ‘फेव्हरिट’ होते. रवींद्र धंगेकर यांनी यापूर्वी दोन वेळा निवडणूक लढवली होती. त्यामुळे विरोधकांचे पुढचे उमेद्वार धंगेकर असणार, याचा भाजपला अंदाज होता. धंगेकर हे अत्यंत तगडे, लोकप्रिय उमेद्वार आहेत, हे भाजपलाही ठाऊक होते.


२. महाविकास आघाडी एकत्र लढली- पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड अशा दोन पोटनिवडणुकांचे निकाल एकाच दिवशी समोर आले. त्यातील कसबापेठ महाविकास आघाडीच्या ताब्यात गेली तर दुसरीकडे पिंपरीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला बंडखोरीचा फटका बसला. पिंपरीत भाजपाच्या उमेदवाराला मिळालेल्या मतापेक्षा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि बंडखोर यांना मिळालेल्या मतांची बेरीज जास्त असल्याचे विश्लेषण विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केले. तसेच, पुढच्या वेळी बंडखोरी होऊ न देण्याची काळजी घेतली पाहिजे असेही ते म्हणाले. कसब्यात हाच फॅक्टर महाविकास आघाडीसाठी फायद्याचा ठरला. भाजपाला थेट महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्रितपणे येऊन भिडले. याऊलट भाजपचे दिग्गज नेते या निवडणुकीत उतरले हे खरे, पण त्यांची सरबराई करण्यातच कार्यकर्ते आणि नगरसेवकांचा वेळ गेला. त्यामुळे घरोघरी जाऊन प्रचार झाला नसल्याचे चित्र दिसले. त्यामुळेच, बड्या नेत्यांना प्रचाराला उतरवूनही या विभागात भाजपाचा पराभव झाला.
३. दुरंगी लढत झाल्याचा भाजपला फटका- भाजपाचा कसब्यातील आतापर्यंतचा इतिहास पाहता, भाजपाकडे गेली ३० वर्षे हा गड होता. कसब्यात गेली २५ वर्षे गिरीष बापट हे आमदार म्हणून निवडून येत होते, तर गेल्या निवडणुकीत मुक्ता टिळक यांना आमदारकीचे तिकीट देण्यात आले होते. या साऱ्या बाबतीत महत्त्वाची बाब ठरली ती भाजपा विरूद्ध महाविकास आघाडी हे थेट लढत. एका आकडेवारीनुसार, ब्राह्मण मतांची टक्केवारी निव्वळ 13% असतानाही कसब्यात आमदार ब्राह्मण राहिलेत. गिरीश बापट यांनी अठरापगड समाजाला सोबत घेऊन काम केले. नंतर मुक्ता टिळकांना तिकीट मिळाले असले तरी नियोजनात बापटांचा मोठा वाटा होता. मुक्ता टिळक या २८ हजार मतांनी म्हणजेच २० टक्के मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. त्याआधी २००९ ला गिरीश बापट हे अवघ्या पाच टक्के मतांनी निवडून आले होते. पहिल्याच निवडणुकीत त्यावेळच्या मनसेच्या रवींद्र धंगेकरांना तब्बल ३० टक्के म्हणजे दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. यानंतरच्या निवडणुकीत २०१४ लाही बापट जिंकले. त्यांचे मताधिक्य २० टक्क्यावर होते. पण बापटांना एकूण ४३ टक्के मते मिळाली होती आणि विरोधातल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि शिवसेना यांच्या उमेदवारांच्या मतांची गोळाबेरीज ५० टक्क्यांवर जात होती. याच पॅटर्न लक्षात घेत, महाविकास आघाडीने येथे दुरंगी लढत केली आणि त्याचा थेट फायदा महाविकास आघाडीला झाला. त्यातच आजारी गिरीश बापट यांना प्रचारात आणले, पण उमेदवार ठरवताना त्यांना विश्वासात घेतले गेले नाही, अशीही चर्चा होती.
४. भाजपकडे लोकप्रिय चेहराच नव्हता- गेली ३० वर्षे जो विभाग भाजपाच्या ताब्यात आहे, तेथे भाजपाने गिरीष बापटांनंतर पुण्याचे महापौरपद भूषवण्याचा अनुभव असलेल्या मुक्ता टिळक यांना गेल्या वेळी मैदानात उतरवले होते. बापट आणि त्यानंतर टिळक हे दोनही चेहरे पुण्याच्या आणि कसब्याच्या लोकांच्या परिचयाचे होते. यांनी तळागाळातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात केली असल्यामुळे, ते त्या विभागात लोकप्रिय होते. पण मुक्ता टिळक यांच्या अकाली निधनानंतर भाजपाला त्या विभागात लोकप्रिय चेहरा देता आला नाही. त्यामुळे मतदारांनी महाविकास आघाडीच्या रविंद्र धंगेकरांना पसंती दर्शवली. अनेक वर्षे नगरसेवक असलेले रविंद्र धंगेकर हे तुलनेने लोकप्रिय होते, त्याचा फायदा धंगेकर यांना आणि तुलनेने महाविकास आघाडीला झाला. भाजपकडे गिरीश बापट यांच्यासारखे सर्व स्तरात लोकप्रिय असणारे आमदार २५ वर्षे होते. गिरीश बापट अथवा मुक्ता टिळक यांच्यापैकी कोणीही २०२४चे उमेद्वार असू शकणार नाहीत, हे भाजपला ठाऊक आहे. तरीही त्यांनी कोणतीही तयारी केली नाही. भाजपकडे उमेदवारच नव्हता, ही यातील सगळ्यात मोठी अडचण होती.
५. सरकार पडल्यामुळे महाविकास आघाडी आणि ठाकरेंना मिळालेली सहानुभूती- २०२२ मध्ये महाविकास आघाडीला मिळालेला ‘जोर का झटका’ हे देखील कसब्यातील भाजपाच्या पराभवाचे महत्त्वाचे कारण असू शकते. महाविकास आघाडीच्या आणि तत्कालीन शिवसेनेच्या मतदारांचा एकनाथ शिंदे यांच्या कृत्यावर काही अंशी अजूनही रोष आहे. ‘एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या हातून सत्ता ओरबाडून घेतली आणि त्यासाठी त्यांनी गद्दारी केली’, अशा प्रकारचे चित्र महाविकास आघाडी आणि ठाकरे गट गेल्या ९-१० महिन्यांपासून उभं करू पाहत आहे. काही ठिकाणी या दाव्यांना भावनेची किनारही दिसून येते. अशा परिस्थितीत पुण्याच्या आणि विशेषत: कसब्यातील मतदारांना हा भावनिक मुद्दा जास्त रुचला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.