काही दिवसात रब्बी हंगामाला (Rabi Season) सुरुवात होणार आहे. रब्बी हंगामात शेतकरी हरभरा आणि गव्हाची मोठ्या प्रमाणात पेरणी करत असतात. याकरता केंद्र आणि राज्य शासनामार्फत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि कृषी उन्नती योजनेंतर्गत ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. दोन्ही योजनेत शेतकऱ्यांना हरभरा आणि गहू प्रमाणित बियाणे अनुदानावर मिळणार आहे. हरभरा व गहू बियाणे महाबीज विक्रेत्याकडे उपलब्ध राहणार आहेत.


खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी अनुदानित दराने बियाणे प्राप्त करुन घेण्याकरीता नजिकच्या कृषी कार्यालय तसेच महाबीज कार्यालयात संपर्क साधावा. अनुदानावर कमी दरात महाबीजचे हरभरा व गहू प्रमाणित बियाणे उपलब्ध असून याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन महाबीजचे विभागीय व्यवस्थापक विनोद पाटील यांनी केले आहे.