पावसावरून पुण्यात मुरलीधर मोहोळ, अजित पवारांत शाब्दिक चकमक

पुण्याच्या पावसावरुन, निर्माण झालेल्या परिस्थितीवरुन आता माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात ट्विटर वॉर बघायला मिळत आहे.  मुरलीधर मोहोळ यांनी विरोधीपक्ष नेते अजित पवारांवर प्रश्नांचा भडीमार करत निशाणा साधला आहे. बांधलेले उड्डाणपूल का पाडावे लागले?, सार्वजनिक वाहतुकीचा बोजवारा का उडाला? अशा प्रकारचे प्रश्न विचारत मुरलीधर मोहोळांनी शहरातील रखडलेल्या कामांवरुन त्यांना जाब विचारला आहे.

पुण्यातील पावसानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवरुन राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवून भाजपनं पुणे शहराचं पार वाटोळं करून ठेवलं आहे, अशी टीका अजित पवारांनी ट्वीट करत भाजपवर केली होती. त्यावर मुरलीधर मोहोळांनी प्रश्न उपस्थित करत प्रत्युत्तर दिलं आहे. 

ट्वीटमध्ये कोणत्या प्रश्नांचा भडीमार?
बांधलेले उड्डाणपूल का पाडावे लागले?, आंबिल ओढा दुर्घटनेतील बळींना जबाबदार कोण?, PMPML का खिळखिळी झाली?, सार्वजनिक वाहतुकीचा बोजवारा का उडाला?, मेट्रो दहा वर्षें कागदावर कोणी ठेवली?, कचऱ्याची समस्या का झाली?, BRT बळींचं पाप कोणाचं? असे शहरातील विविध बाबींवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहे. 

भाजपनं पुणे शहराचं पार वाटोळं करून ठेवलं; अजित पवारांची टीका
स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवून भाजपनं पुणे शहराचं पार वाटोळं करून ठेवलं आहे. काल सायंकाळी अतिवृष्टीमुळे भाजपशासित पुणे मनपानं पुण्यात काय दिवे लावलेत याची कल्पना येते. लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. मनपाला ‘अव्यवस्थेची’ कारणं काय आहेत ती सांगावीच लागतील, अशी टीका अजित पवारांनी ट्विटरवरुन केली होती. तूर्तास पुण्यातील जनतेला आवश्यक ती सर्व मदत करणं गरजेचं आहे. यासाठी आम्ही पाठपुरावा करतंच आहोत. जनतेनं देखील आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन करतो. सर्व प्रशासकीय यंत्रणा आवश्यक ती पाऊलं उचलून स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर काम करत असून त्याचा आढावा आम्ही घेत आहोत, असंही त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!