Chhatrapati Sambhajinagar : राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर केले. त्यामुळे तमाम हिंदूंच्या भावना आनंदाने उत्साहीत झाल्या, प्रफुल्लित झाल्या. परंतु काही धर्मांध जातीवादी संघटना ह्या औरंगजेब व निजामाचा वारसा चालवत आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले, अशी टीका भाजपचे शहराध्यक्ष शिरीश बोराळकर यांनी केली आहे.


शहराच्या नामांतराविरोधात साखळी उपोषण करणाऱ्या खासदार इम्तियाज जलील यांच्यावर टीका करतांना या नामांतराने त्यांचा तिळपापड झाल्याचा टोला देखील त्यांनी लगावला. बोराळकर म्हणाले, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर केल्याने संताप झाला आहे.
ज्या जुलमी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांना हालहाल करून मारले , त्यांचा अतोनात छळ केला त्या औरंगजेबाचे नाव शहराला होते. मागील ३५ वर्षांपासून सर्व सामाजिक संघटना व जनभावनेचा आदर राखून शिंदे- फडणवीस सरकारने ही मागणी पूर्ण केली. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर केले, पण या विरोधात एमआयएम ह्या जातीवादी संघटनेचे कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत.
ज्या औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद करून ठेवले, त्यांचा छळ केला त्या धर्मांधाचे नाव शहराला होते. ते बदलून शहराचे नामकरण केले तर यांना पोटदुखी का होतेय? हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी हे जाणीवपूर्वक केले जात असल्याचा आरोप करत या प्रवृत्तीचा भाजप निषेध करते, असेही बोराळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून सांगितले.