परतीच्या पावसाने मराठवाड्यात शेतकऱ्यांच अतोनात नुकसान झाले असून, याच नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. औरंगाबाद येथील गंगापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची उद्धव ठाकरे पाहणी करणार आहेत. विशेष म्हणजे शिंदे गटाचं बंड आणि सत्तांतरानंतर उद्धव ठाकरेंचा हा पहिला दौरा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.


परतीच्या पावसाने मराठवाड्यात अक्षरशः धुमाकूळ घातला असून, पीक मातीमोल झाली आहे. दिवाळी सारखा सण सुद्धा शेतकरी साजरा करू शकत नसल्याची परिस्थिती आहेत. अशात बळीराजाला मदतीची आणि धीर देण्याची गरज आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आज औरंगाबादचा दौरा करत नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. तसेच त्यांच्या व्यथा देखील जाणून घेणार आहे. गंगापूर तालुक्यातील दहेगाव, पेंढापूर या दोन गावातील नुकसानीची ठाकरे पाहणी करतील. तर एबीपी माझाने व्यथा दाखवलेल्या शेतकरी कुटुंबातील सदस्यांची उद्धव ठाकरे भेट देखील घेण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार?
औरंगाबादसह मराठवाड्यात परतीच्या पावसाने मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागात अजूनही सरकारी यंत्रणा पोहचली नाही. तर बहुतांश भागात पंचनामे देखील झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यातच महसुल विभागातील अनेक कर्मचारी कागदोपत्री नुकसान पाहणी करत असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे याच फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे पाहायला मिळत आहे.
असा असेल उद्धव ठाकरेंचा दौरा….
> दुपारी 12.15 वा. औरंगाबाद विमानतळाहुन दहेगाव ता. गंगापुर कडे प्रयाण
> दुपारी 01.00 वा. दहेगाव ता. गंगापुर येथे आगमन व दहेगाव शिवार येथे पीक नुकसानीची पाहणी
> दुपारी 01.15 वा. पेंढापूर ता. गंगापुरकडे प्रयाण
> दुपारी 01.30 वा. पेंढापूर ता. गंगापुर येथे आगमन व पीक नुकसानीची पाहणी
> दुपारी 01.45 वा. पत्रकारांशी संवाद
> दुपारी 02.45 वा. चिकलठाणा विमानतळ औरंगाबाद प्रयाण