

प्रतिनिधी जळगाव, डॉ. उल्हास पाटील यांच्याबद्दल स्व. विलासराव देशमुख यांच्याकडुन खुप कौतुक ऐकले होते. ज्यावेळी लोकसभेची निवडणूक यायची तेव्हा जळगावच्या बाबतीत आम्ही विचारायचो कि तिकीट कुणाला? तेव्हा स्व. विलासराव देशमुख साहेब सांगायचे ‘लोकसभा आणि जळगाव म्हटले म्हणजे वन ऍण्ड ओन्ली डॉ. उल्हास पाटील’ अशा शब्दात जुने किस्से सांगत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला.
राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाच्यावतीने चेअरमन तथा माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी ना. अमित देशमुख यांचा सत्कार केला. याप्रसंगी कॉंग्रेसचे आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, माजी जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप पाटील, उदय पाटील, युवकचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, डी.जी. पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. ना. अमित देशमुख पुढे म्हणाले की, कोरोना काळात डॉ. उल्हास पाटील यांच्याशी अनेकदा संवाद व्हायचा. ते नेहमीच याठिकाणच्या अडीअडचणी, शासनाकडील अपेक्षा याबाबत चर्चा करायचे. जळगाव जिल्ह्यात एवढे भव्य वैद्यकीय महाविद्यालय असल्याचे अभिमान आहे. स्व. विलासराव देशमुख साहेब यांच्याकडुन अनेक किस्से ऐकले आहेत. वडीलांचे आणि डॉ. उल्हास पाटील यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्याच दुरदृष्टीतुन उभ्या राहिलेल्या या वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिल्याचा मनस्वी आनंद आहे. डॉ. उल्हास पाटील यांनी मराठवाडा, मुंबई याठिकाणी देखिल अशी संस्था उभी करावी त्यासाठी शासनाकडुन आवश्यक ती मदत नक्कीच केली जाईल अशी ग्वाहीही ना. अमित देशमुख यांनी देताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाच्या माध्यमातुन डॉ. उल्हास पाटील यांच्या हातुन खरी देशसेवा होत असल्याचे गौरवोद्गारही ना. देशमुख यांनी काढले. राज्यात वैद्यकीय क्षेत्राला दिशा देण्याचे काम ना. अमित देशमुख यांच्याकडुन होत असल्याचे माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी प्रास्ताविकातुन सांगितले. तसेच त्यांनी दिवंगत नेते विलासरावजी देशमुख यांच्या आठवणींनाही उजाळा दिला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राचार्य, प्राध्यापक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या जीवनावरील चलचित्रङ्गित दाखविण्यात आली.